Wednesday, March 13, 2019

सिक्कीम: "विशलिस्ट"

खरं तर सिक्कीममध्ये कितीतरी अनवट ठिकाणं आहेत—त्यातली काही बघितली, काही राहून गेली. ती आता माझ्या विशलिस्टमध्ये लिहून ठेवलेली आहेत, तीच शेअर करतोय!

सिल्क रूट 

प्राचीन काळी चीनचा जगाशी ज्या मार्गाने व्यापार चाले त्याला 'सिल्क रूट' म्हणतात. चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे चहा, चिनी माती आणि अर्थातच, रेशीम! भारताने एक महत्वाची गोष्ट निर्यात केली, ती म्हणजे बौद्ध तत्वज्ञान!

पूर्व सिक्कीमच्या नथुला आणि जेलेपला या खिंडी म्हणजे सिल्क रूटची भारतातील प्रवेशद्वारे. त्यापैकी नथुला खिंड बघता येते, पण जेलेपला नाही. पण या खिंडींकडे जाणारा मार्ग "सिल्क रूट" म्हणून प्रसिद्ध आहे.

सिल्क रूटच्या बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी परमिट लागतं. त्याची आपल्या ट्रॅव्हल एजन्टतर्फे सोय करून ठेवलेली बरी. सिल्क रूटची बरीच ठिकाणं हाय आल्टीट्यूडवर आहेत, त्यामुळे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सिल्क रूटला जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सिल्क रूटला अनेक प्रकारे जाता येतं, पण साधारणपणे प्रवासाची रूपरेषा खालीलप्रमाणे:
सिलिगुडी - कालिंपोंग - झुलुक - कुपूप - बाबा हरभजन सिंग बंकर (Old Baba Mandir) - बाबा मंदिर (New Baba Mandir) - नथुला - चांगु लेक - गँगटोक



झीरो पॉईंट ते त्सो लामो लेक 

युमसामदोन्ग, अर्थात झीरो पॉइंटला रस्ता संपतो आणि पहाड सुरु होतात. पण नीट बघितलं तर तिथूनही पुढे एक पायवाट जाते, ती थेट त्सो लामो लेकपाशीच पोचते!

झीरो पॉईंट याचा अर्थ रस्त्याचा शेवट. अर्थातच गाड्या जाऊ शकतील असा रस्ता नाहीच, पण हा दुर्गम मार्ग बर्फातून जात-जात दोन्गका ला (Donghka La) या खिंडीपर्यंत जातो. अवघड चढण आणि भन्नाट वाऱ्याला तोंड देत ही खिंड पार केली की पुढे तिबेटचं पठार! सपाट, वैराण आणि अतिथंड. "थोडंसच" पुढे गेलं की भारतातलं सर्वोच्च सरोवर "त्सो लामो" (Tso Lhamo किंवा Cholamu Lake) लागतं. इथून जवळच गुरुदोंगमार लेक.

हा "रस्ता" दुर्गम तर आहेच, पण तिबेटच्या सीमेजवळचा. त्यामुळे इथे यायचं परमिट मिळणंही दुरापास्त. बघूया कधी योग येतोय ते!



Tuesday, March 5, 2019

सिक्कीम: लाचुंग-युमथांग

तुम्ही The Sound of Music हा सिनेमा बघितला आहे का? त्याच्यातलं साल्झबर्ग गाव आठवतंय? एक उंच पर्वतकडा, त्याच्या माथ्यावर बर्फाची टोपी, पायथ्याशी चिमुकलं गाव, सभोवती हिमशिखरं—अगदी तस्साच आहे लाचुंग परिसर! अगदी चित्रातल्यासारखा!

लाचेनहून निघून चुंगथांग गाठायचं आणि उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे जाऊन लाचुंग. पोचल्यावर परत एकदा वरण-भात, बटाट्याची भाजी असं फक्कड (!) जेवायचं आणि रात्री लवकर झोपी जायचं. तशी काल रात्री फारशी झोप झालेलीच नाहीय. दुसऱ्या दिवशी सिक्किममधला सर्वात सुंदर भाग बघायला जायचंय!

सकाळी आन्हिकं उरकायची आणि निघायचं. पहाडात चढताना थोड्याच वेळात रस्त्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेल्या पाट्या दिसतात. "अरे, हे इथे कुठे?" असा विचार मनात येइपर्यंत Maratha Light Infantryची पाटी दिसते आणि समोरच आपले मराठमोळे जवान! त्यांना भेटल्यावर त्यांना आणि आपल्याला, दोघांनाही, माहेरचं माणूस भेटल्यासारखं वाटतं!

आता खडी चढण सुरु होते. एकीकडे एक उत्तुंग हिमकडा आपली साथ देत असतो आणि अचानक चहूकडे ऱ्होडोडेंड्रॉन्सचं 'जंगल' लागतं. चार-पाच फूट उंचीची झुडपं, त्यावर लागलेली लाल भडक फुलं आणि आसमंतात पसरलेला मादक गंध! इतका भडक लाल रंग कदाचित आपण प्रथमच पाहात असतो!

या Shingba Rhododendron Sanctuaryमध्ये कितीही मोह झाला तरी फुलांना हात लावायचा नाही, कुणी बघितलं तर मोठा दंड भरावा लागेल! पण इतक्या सुंदर नजाऱ्याचे फोटो मात्र जरूर काढायला हवेत—भडक फुलांचं जंगल, चहुबाजूनी हिमशिखरे, पाठीमागे हिमकडा. क्या बात है!

थोडं अजून पुढे गेलं की याकचे आणि झिपऱ्या घोड्यांचे कळप दिसू लागतात. कधीतरी त्यांच्याबरोबर भलंमोठं तिबेटन मॅस्टिफ जातीचं कुत्रं लक्ष वेधून घेतं.

आता आपण एका 'विचित्र' ठिकाणी पोचतो. एका बाजूला ढासळलेला कडा, दुसरीकडे आडवे झालेले सूचिपर्णी वृक्ष, मध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेला रस्ता—एखाद्या भयपटात शोभावी अशी जागा! 2011 सालच्या भूकंपाचं एपिसेन्टर इथेच होतं म्हणे!

या भीषण आणि विद्रुप ठिकाणाहून पुढे गेल्यावर मात्र आपण एका स्वप्ननगरीत येऊन पोचतो. हीच ती युमथांग व्हॅली—सिक्किममधलं सर्वात सुंदर ठिकाण! एका बाजूला उत्तुंग हिमशिखरं, दुसरीकडे घनदाट जंगल असलेला डोंगर आणि त्यांच्या दरम्यान बशीसारखी पसरट युमथांग व्हॅली.

व्हॅलीच्या एका बाजूने रस्ता जातो तर दुसऱ्या बाजूने एक उथळ नदी. आणि या दोहोंच्या दरम्यान पसरलेलं प्रचंड मोठं कुरण. इथली गंमत म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हे कुरण छोट्या रानफुलांनी भरून जातं! पुढच्या आठवड्यात ही फुलं सुकतात आणि दुसऱ्या प्रकारची फुलं फुलतात. जूनपर्यंत हा खेळ सुरु असतो! ही सिक्कीमची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स डोळ्यांचं पारणं फेडते. खरं तर इथे निवांत वेळ काढायला हवा. अफाट कुरण आणि त्यावर चरणारे याक, फोटो तो बनता है! पण हा आनंद अर्ध्यावरच ठेवून आता पुढे निघायला हवं, कारण आता आपल्याला बर्फात खेळायला जायचंय!

युमसामदोन्ग (Yumesamdong) हे यापुढचं शेवटचं ठिकाण. यापुढे रस्ता नाही, म्हणून याला झीरो पॉईंट म्हणतात. युमथांग व्हॅली सोडून पुढे निघालं की हळूहळू झाडं-झुडपं विरळ होत जातात. वाट उंच चढत जाते आणि सगळीकडे रखरखाट पसरतो. उभे पहाड, खोल काळ्याकुट्ट दऱ्या आणि खडी चढण चढता चढता अचानक स्नो लाईन लागते आणि चमत्कार होतो. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फच-बर्फ! डोळे दिपून जातत. बर्फातून वाट काढत आपण एका सपाटीवर येतो आणि रस्ता संपतो—हाच तो झीरो पॉईंट!

चहूकडे बर्फ, त्यातून गेलेला रस्ता, शेजारी अनेक ठेले आणि त्यावर भुट्टा, चणे, मॅगी, मोमो आणि दारू (!) विकणारे भुटिया लोक. पलीकडच्या बर्फ़ातूनच एक छोटासा झरा वाहतो, त्यावर एक पूल आणि त्यापलीकडे बर्फाची टेकडी. खेळा लेको किती बर्फ खेळायचं ते!

बर्फात खेळून कंटाळलं की परतायचं, त्याच रुद्रभीषण मार्गावरून खाली उतरायचं, युमथांग व्हॅलीमध्ये कुरणावर मस्त लोळायचं आणि संध्याकाळच्या आत परत लाचुंगला.

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry) बघण्यासारखी आहे. तिथे भेट द्यायची आणि रात्री परत हॉटेलवर. उत्तर सिक्कीमची स्वप्नातली दुनिया सोडून उद्या आपल्याला परत गँगटोकला जायचंय.

लाचुंग परिसरात बघायची ठिकाणे 

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry)
Shingba Rhododendron Sanctuary
युमथांग व्हॅली
युमथांग हॉट स्प्रिंग्स
युमसामदोन्ग, अर्थात झीरो पॉईंट



Monday, March 4, 2019

सिक्कीम: गुरुदोंगमार लेक

भारतात खूप कमी ठिकाणं आहेत जिथे आपण (भारतात राहून) साक्षात हिमालय ओलांडू शकतो, गुरुदोंगमार लेक त्यापैकी एक! सिक्कीमच्या उत्तरेला हिमालय ओलांडून जायला एक फट आहे, तिथून आपण थेट तिबेटच्या पठारावर जाऊ शकतो. तिथेच आहेत भारतातली अति-उंचीवरची दोन सरोवरं: त्सो लामो लेक (Tso Lhamo Lake) आणि गुरुदोंगमार लेक (Gurudongmar Lake).

गुरुदोंगमार लेक समुद्रसपाटीपासून 5183 मीटर, म्हणजेच 17000 फुटांवर आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी, विरळ हवा आणि लहरी हवामान. दुपारी बारानंतर इथे रोज वादळ होतं, त्यामुळे अर्थातच लवकरात लवकर इथे जाऊन सुखरूप परत यायचं!

हे सरोवर तिबेटच्या (चीनच्या) सीमेपासून चार-पाच किलोमीटरवर आहे. त्यामुळे अर्थातच गुरुदोंगमार लेकला जायला स्वतंत्र परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजंटने सगळी तयारी आधीच केल्यामुळे आपलं काम सकाळी लवकरात लवकर निघायचं.

दुपारच्या वादळाच्या आत परतायचं असल्यामुळे लवकरच निघावं लागतं. शिवाय वेगात चढत गेल्यावर विरळ हवेचा त्रास (altitude sickness) जास्त होतो, त्यामुळे शक्य तेवढं सावकाश चढायचं. पहाटे चारच्या आत चढाई सुरु व्हायला हवी.

पहाटे लवकर निघाल्यामुळे कदाचित नाश्ता झालेला नसतो, पण आपल्याजवळ तहानलाडू-भूकलाडू असलेले केव्हाही उत्तम. भरपूर पाणी प्यायल्यावर (आणि लघुशंका केल्यावर) आल्टीट्यूड सिकनेसचा त्रास कमी होतो. त्यामुळे भरपूर पाणी जवळ ठेवावं (आणि कडाक्याच्या थंडीत इच्छा नसली तरी) पीत राहावं! अर्थात अशा दुर्गम ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची शहानिशा डॉक्टरकडून आधीच करून घेतलेली बरी.

भल्या पहाटे लाचेन सोडल्यावर आपली जीप रस्त्यासारख्या दिसणाऱ्या (!) वाटेने चढू लागते. हाडं खिळखिळी करत आणि काळजाचा ठोका चुकवत खडी चढण सुरु होते. बाजूचं घनदाट जंगल हळूहळू बदलू लागतं. सूचिपर्णी वृक्षांच्या जागी खुरटी ऱ्होडोडेंड्रॉन्स दिसू लागतात आणि पहाता-पहाता निसर्ग बदलतो.

आता सगळीकडे रखरखाट दिसू लागतो. आजूबाजूला उघडे डोंगर आणि त्यावर तुरळक बर्फ, म्हणजे आता आपण स्नो-लाईन ओलांडली असते! त्याच्याही पल्याड उंचच-उंच हिमाच्छादित पर्वतशिखरं हळूच डोकावू लागतात आणि आपण 'थांगू' नावाच्या खेड्यात पोचतो.

थंडी 'मी' म्हणत असते, भन्नाट वारं वहात असतं. कसाबसा जीव सांभाळत आपण एका खोपट्यात शिरतो आणि त्या 'हॉटेल'ची मालकीण, एक भुटिया म्हातारी, आपलं स्वागत करते!

मोमो, मॅगी, गरम चहा, हवी असल्यास दारू (व्हिस्की, ब्रँडी, इत्यादी) असा भरगच्च मेनू आपल्यासाठी तयारच असतो. खायचं प्यायचं आणि सुटायचं! (एक महत्वाची सूचना: कितीही मोह झाला तरी हाय-आल्टीट्यूडला मद्यपान टाळावेच. विरळ हवेचा त्रास जास्त होतो.)

हॉटेलमध्ये नाश्ता (!) करून निघाल्यावर आपली गाडी आता वेग घेते. चढण आता कमी झालेली असते आणि बऱ्यापैकी सपाटीवरून आपली गाडी धावत असते. मनुष्यवस्तीचं शेवटचं ठिकाण म्हणजे 'थांगू'. आता यापुढे रस्त्यात फक्त तुरळक याकचे कळप, त्याबरोबर एखादं 'तिबेटन मॅस्टिफ' जातीचं भलंमोठं कुत्रं आणि दऱ्याखोऱ्यात दडलेले सैनिकांचे सुसज्ज बंकर्स! हां, एक सांगायचं राहिलंच. लवकरच एक चांगलं हॉटेल येणार आहे!!!

बरोब्बर पंधरा हजार फूट उंचीवर लष्कराचं ठाणं आहे. काही लष्कराच्या गाड्या, बराकी आणि त्यातच एक कामचलाऊ हॉस्पिटलसुद्धा आहे! तिथे लष्कराचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. कुठलाही त्रास होत असेल तर प्रथमोपचार करून, गरज असेल तर, पेशंटला कमी उंचीवर पाठवलं जातं. आणि या हॉस्पिटलसमोरच आहे Cafe 15000, जगातलं सर्वाधिक उंचीवरचं हॉटेल!

कॅफे 15000मध्येही जवळपास तेच पदार्थ मिळतात: मॅगी, मोमो, सामोसे आणि कांदाभजीसुद्धा! इथे रॉकेलच्या हीटरशेजारी बसून बसून गरमगारम भजी खायची मजा वेगळीच! खरंतर हेसुद्धा एक छोटंसं खोपटंच. दोन बाकडी, एक हीटर, एक काउंटर आणि छोट्याश्या देव्हाऱ्यात बाबा हरभजनसिंगचा फोटो!

इथले सैनिक मात्र खूप प्रेमळ! हसतमुख आणि मदतीला तयार. एखादा सातारा-कोल्हापूरकडचा असेल तर आपल्या भज्यांचे पैसेही तोच भरणार! आपल्याबरोबर लहान मूल असेल तर त्यांच्यातलं कुणीतरी चॉकलेट देणार. अशा खडतर ठिकाणी सैनिकांच्या नुसत्या दर्शनानेही आपल्याला आधार वाटतो!

भरपेट नाश्ता केल्यावर आपली गाडी सुसाट निघते. एव्हाना आपण भारतीय उपखंड ओलांडून, हिमालयाच्याही पलीकडे, तिबेटच्या पठारावर आलेलो असतो. यापुढे जवळपास सपाट आणि डांबरी सडक. त्यामुळे बघता-बघता आपण एका टेकडीपाशी येतो. समोरचा रस्ता "त्सो लामो लेक"ला जातो. भारतातलं ते सर्वोच्च सरोवर, पण तिथे जायचा परवाना मिळणं अवघड. पण इथे तर आपण भारतातल्या दुसऱ्या उंच सरोवरापाशी पोचलोय. गाडी एक छोटीशी चढण चढते आणि आपोआपच "अहा!" असे उद्गार बाहेर पडतात! समोर साक्षात गुरुदोंगमार लेक दिसतं.

समोर हिमाच्छादित पर्वत, त्यातून येणारी हिमनदी या निळ्या-पांढऱ्या सरोवरात अलगद उतरते. बहुतेक सरोवर गोठलेलं, पण एका भागात मात्र स्वच्छ पाणी. गुरु रिम्पोचे, अर्थात गुरु पद्मसंभवांनी स्पर्श केल्यामुळे सरोवराचा हा भाग हिवाळ्यातही गोठत नाही म्हणतात.

गाडीतून उतरताना मात्र जपून! विरळ हवेची कल्पना खाली उतरल्यावरच येते. एकेक पाऊल टाकणंही मुश्किल, सरोवरापाशी खाली उतरायचा विचार न केलेलाच बरा! सावकाश चालत, दम खात शेजारच्या 'सर्व धर्म स्थल' या मंदिराला भेट द्यायची आणि तडक परतीचा रस्ता धरायचा. माध्यान्हीच्या आधी इथून खाली उतरायला हवं!

परतीच्या मार्गावर 'चोपता व्हॅली'चे फोटो काढायचे आणि लाचेनला पोचायचं. आपल्याला आजच लाचुंगला पोचायचं आहे. (टीप: 'चोपता व्हॅली' नावाचं अजून एक ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे!)

गुरुदोंगमार लेकला जाताना बघायची ठिकाणे

थांगू व्हॅली
15000 कॅफे
गुरुदोंगमार लेक
चोपता व्हॅली


सिक्कीम: उत्तर सिक्कीम

गँगटोक सोडून आपण उत्तरेकडे निघालो की माणसं दिशेनाशी होतात आणि जंगलं सुरु होतात! जसजसं उत्तरेला जाऊ तसे रुंदपर्णी वृक्ष कमी होऊन सूचिपर्णी वृक्ष दिसू लागतात. आजूबाजूला खड्या पर्वतरांगा, त्यावर घनदाट वृक्षराजी, कुठे तुटलेला कडा  तर कुठे त्यावरून कोसळणारा धबधबा आणि त्याही पलीकडे दिसणारी हिमाच्छादित शिखरं! उत्तर सिक्कीम ही एक वेगळीच दुनिया आहे. तीन बाजूंनी उत्तुंग पर्वतरांगा आणि मधल्या बेचक्यात वसलेली लेपचा लोकांची छोटी खेडी. मनुष्यवस्ती तशी विरळच, कारण घर बांधायला सपाट जागा तर हवी ना!

या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूंनी लगट करणारा चिनी ड्रॅगन तर तिसऱ्या, नेपाळच्या, बाजूला कांचनजंगावर वास्तव्य करणारी झोन्गा देवता अश्या आंतर्राष्ट्रीय शेजारामुळे उत्तर सिक्कीमला येण्यासाठी परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजन्टने आधीच सगळी तयारी केलेली असते. त्यामुळे मंगन, रंगरंग अशा रस्त्यात येणाऱ्या चेकपोस्ट्सना आपली कागदपत्रं दिली जातात आणि आपण पुढे जातो.

आता मात्र रस्ता कठीण होऊ लागतो. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं अस्तित्वच नसतं. जेंव्हा आपला ड्रायव्हर धबधब्यातून येणारं पाणी  जिथे दरीत उडी घेतं त्या (वाहून गेलेल्या) रस्त्यातून आपली गाडी घालतो तिथे मात्र काळजाचा ठोका चुकतो! एकीकडे उंच डोंगर, दरीमध्ये वाहणारी तीस्ता नदी. क्वचितप्रसंगी आपल्याला खोल दरीतून येणारी खळखळही ऐकू येते तर कधी दोन डोंगरांच्या फटीतून कांचनजंगा दर्शन देतं!

कडेकपारीतून दिवसभर प्रवास करून आपण चुंगथांगला येऊन पोचतो. इथे दोन रस्ते फुटतात: एक लाचुंगला जातो तर दुसरा लाचेनला. आपण डावीकडचा रस्ता धरतो आणि चढत-चढत लाचेन (अर्थात, मोठी खिंड) या छोट्याश्या वस्तीवर येऊन पोचतो.

लाचेनच्या भन्नाट वाऱ्याला आणि कडाक्याच्या थंडीला तोंड देत कसंबसं सामान टाकायचं आणि जेवायची तयारी करायची. जेवण तरी कुठलं? वरण -भात आणि बटाट्याची भाजी. पण कुठलीही तक्रार न करता लवकरात लवकर झोपायला हवं कारण उद्या आपल्याला पहाटे उठून जगावेगळ्या गुरुदोंगमार लेकला जायचं आहे!

लाचेनला जाताना बघायची ठिकाणे 

सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल्स
कांचनजंगा व्ह्यू पॉईंट


सिक्कीम: नथुला

सिक्कीमच्या पूर्वेकडे हिमालयायची उंचच उंच रांग आहे. त्याच रांगेत एका ठिकाणी आहे 'नथुला'. तिबेटी भाषेत 'ला' म्हणजे खिंड. अर्थात, ही 'नथु' खिंड! प्राचीन काळी भारत-चीन व्यापार याच खिंडीतून चाले. जगप्रसिद्ध 'सिल्क रूट'चा एक फाटा इथूनच जायचा. अलीकडे सिक्कीम (भारत) तर पलीकडे खोलगट चुंबी व्हॅली (तिबेट, चीन). त्याच्याही पलीकडे उंचावर दिसणारा भूटान! सामरिकदृष्ट्या अत्यंत नाजूक प्रदेश.

'नथुला'ला जायला परमिट लागतं. आपला ट्रॅव्हल एजन्ट किंवा हॉटेलवालाही त्यासाठी मदत करू शकतो. आधीच तयार ठेवलेल्या फोटोचा इथे उपयोग होतो.

हा प्रदेश अतिउंचीवरचा. त्यामुळे थंडीबरोबरच विरळ हवेचा त्रास. त्यामुळे इथे येण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा

नाथूलासाठी सकाळी लवकर निघायचं, कारण पुन्हा एकदा वाहनांच्या रांगा! गँगटोकजवळचं चेकपोस्ट ओलांडलं की रस्ता एकदम चढायला लागतो. तीव्र उतार आणि धोकादायक वळणं पार करून आपण 'छांगू लेक'पाशी (Changu Lake किंवा Tsomgo Lake) पोचतो. आजूबाजूचे हिमाच्छादित पहाड आणि समोरचं निळंशार सरोवर! समोरच्या हिमनदीहून येणारं बर्फगार वारं झेलत आपण याकच्या पाठीवर बसायची संधी थोडीच सोडणार?

मनसोक्त 'याक राईड' झाल्यावर आपली गाडी वळते चीनच्या दिशेने, अर्थात नथुलाकडे. चढ वाढत जातो आणि आजूबाजूला बर्फच बर्फ दिसू लागतं. लवकरच दूरवर सैनिकांच्या हालचाली दिसू लागतात आणि आपण नथुलाला पोचतो!

बर्फाळलेल्या पायऱ्या चढत आपण सीमेपाशी पोचतो. एकीकडे भारत तर फूटभर पलीकडे चीन, आणि त्यामध्ये साधं तारेचं कुंपण! बाजूलाच एक सामाईक चौक, जिथे दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्या 'फ्लॅग मिटींग्स' होतात. (आणि आठवणीने एक खुर्ची बाबा हरभजनसिंगसाठी रिकामी ठेवली जाते!) इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत, भन्नाट वाऱ्यात आपले सैनिक कसे रहात असतील ते बाबा हरभजनसिंगच जाणो!

नथुलाच्या पायऱ्या उतरून गाडीत बसलो की आपला मोर्चा वळतो बाबा हरभजनसिंगाच्या समाधीकडे. बाबाचं मूळ मंदिर आहे त्याच्या बंकरमध्ये. पण ते ठिकाण दुर्गम असल्याने लष्कराने जवळच त्याचं मंदिर बांधलंय. "बाबा नवसाला पावतो" अशी सगळ्यांची धारणा आहे, वाटलं तर आपणही अनुभव घेऊन बघू!

नाथूलाचं हवामान बेभरंवशाचं. कधी हिमवादळ येईल किंवा दरड कोसळेल याचा भरवसा नाही. याच्या पुढचा उत्तर सिक्कीमचा प्रवास तर अधिक खडतर, त्यामुळे घरी सुखरूप परत जाईपर्यंत 'बाबा'चा धावा करायला पर्याय नाही!

नाथुलाला बघायची ठिकाणे 

छांगु लेक (याक राईड)
नथुला
बाबा हरभजनसिग मंदिर
बाबा हरभजनसिंग बंकर (हे खूप दूर आहे)

सिक्कीम: गॅंगटोक

गॅंगटोकचा पहिला अनुभव म्हणजे वाहनांच्या लांबच लांब रांगा! सगळीकडे चढ-उतार आणि रस्ते अरुंद, त्यामुळे ट्रॅफिक जॅम तर पाचवीलाच पुजलेला. पण कुठेही गोंधळ नाही, नियमांचं उल्लंघन नाही, अगदी हॉर्नचा आवाजही नाही! सगळीकडे स्वच्छता आणि प्लॅस्टिकचा मागमूसही नाही, त्यामुळे सिक्कीम पाहताक्षणी मनात भरतं.

हॉटेलमध्ये चेक-इन झाल्यावर आपण 'गँगटोक दर्शन' सुरु करतो. गणेश टोक हे एका कड्यावरचं सुंदर मंदिर. कठड्यापाशी उभं राहून शहराचा नजारा बघत राहावा. हनुमान टोक तर त्याच्याहून उंचावरचं मंदिर. इथे तर बऱ्याचदा धुकं असतं.

सिक्कीमचा बराचसा भाग म्हणजे पूर्व हिमालयातलं सदाहरित जंगल. म्हणजे ऑर्किड्सचं नंदनवन! गँगटोकच्या ऑर्किड गार्डनमध्ये जाऊन त्याची झलक तर बघायलाच हवी. तऱ्हेतऱ्हेची फुलं, झाडं यांनी गच्च भरलेली बाग, त्यातले काही प्रकार विकतही मिळतात. किंमत मात्र विचारू नका!

संध्याकाळ मात्र 'एम् जी मार्गा'साठी राखून ठेवायची. गांधीजींच्या पुतळ्यापासून सुरु झालेला हा 'वॉकिंग प्लाझा' म्हणजे शॉपर्सची मक्का. भरपूर दुकानं, ठेले, झाडं, बसायच्या जागा आणि कुठल्याही प्रगत देशाच्या तोडीची स्वच्छता!

दिवसभराच्या दगदगीनंतर आपण हॉटेलमध्ये परत येतो. उद्याचा दिवस मुद्दामच निवांत ठेवलेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी रुमटेक मॉनेस्ट्रीला भेट द्यायची. गॅंगटोक शहराशेजारच्या टेकडीवर वसलेला हा मठ म्हणजे कर्मापा लामांचं महत्वाचं ठाणं. मठातली सुंदर बुद्धमूर्ती, समोरचं विस्तीर्ण पटांगण आणि पूर्वेला दिसणारी हिमाच्छादित शिखरं. क्या नजारा है!

परतीच्या वाटेवर 'रोप वे'मध्ये बसून घ्यायचं आणि परत जाताना झू बघायचा. हे सगळं प्लँनिंग करताना ट्रॅफिक जॅममध्ये जाणारा वेळ विचारात घ्यायलाच हवा! कारण उद्या लवकर उठून आपल्याला चीनच्या सीमेवर 'नथुला'ला जायचंय!

गॅंगटोकमध्ये बघायची ठिकाणे:

गणेश टोक
हनुमान टोक
ऑर्किड शो / फ्लॉवर एक्सिबिशन सेंटर
ताशी व्ह्यू पॉईंट
बांझकरी वॉटरफॉल्स
एम जी मार्ग
लाल बझार
गॅंगटोक रोपवे
गंगटोक झू (Himalayan Zoological Park)
रुमटेक मोनेस्ट्री

सिक्कीम: पूर्वतयारी

भारतात खूप कमी ठिकाणं आहेत जिथे आपण (भारतात राहून) साक्षात हिमालय ओलांडू शकतो. सिक्कीम त्यातलं एक! तीन बाजूंनी उत्तुंग पर्वतांच्या सापटीत अडकलेलं हे 'अंगठ्याच्या' आकाराचं चिमुकलं राज्य थेट गंगा-ब्रह्मपुत्रेच्या मैदानात, बंगालमध्ये 'चिकन्स नेक'पाशी उतरतं.

सिक्कीमच्या आजूबाजूला नेपाळ, चीन आणि भूटान हे तीन देश, तर 'चिकन्स नेक'पाशी जवळीक करणारा बांगलादेश चौथा. या शेजाऱ्यांच्या अस्तित्वामुळे साहजिकच इथे सैन्याचा जागता पहारा!

हे एकमेव राज्य आहे जे स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर तीन दशकं स्वतंत्र देश होतं आणि स्वेच्छेने भारतात सामील झालं. एकमेव राज्य जिथे आपण वाहनात बसून 'नथुला' खिंडीत चीनची सीमा बघू शकतो. एकमेव राज्य जे भारताच्या सर्वोच्च शिखराला, कांचनजंगाला, टेकलेलं आहे!

इथले मूळचे लोक 'लेपचा'. ते म्हणे खूप आधी पूर्व आशियातून इथे आले. इथले राज्यकर्ते होते 'भुटिया'. ते म्हणे तिबेटमधून इथे आले. पण संख्येने सर्वाधिक आहेत ते 'नेपाळी'. अर्थातच, नेपाळमधून आलेले. त्यामुळे इथल्या 'वेगळ्या' दिसणाऱ्या, पण हसऱ्या लोकांची भाषा मात्र आपल्याला समजणारी!

आता सिक्कीमला जायची तयारी करूयात. आपण भारतीय नागरिक, त्यामुळे आपलं सरकारी ओळखपत्र तयार ठेवायला हवं. शिवाय सिक्किममधल्या सीमावर्ती भागात जायला जे परवाने लागतात त्यासाठी आपले फोटोसुद्धा जवळ ठेवुयात, ऐनवेळी अडचण यायला नको. जर कुणी परदेशी नागरिक असेल तर मात्र त्यांना 'इनर लाईन परमिट' घ्यावं लागतं. (तरीही, जाण्यापूर्वी एकदा "नियम बदलले तर नाहीत ना" याची खातरजमा करून घ्यावी!)

सिलिगुडी म्हणजे सिक्कीमचं प्रवेशद्वार. जरीआपण विमानाने बागडोगराला आलो किंवा रेल्वेने न्यू जलपैगुडीला,  खरा प्रवास सुरु होणार तो सिलिगुडीहूनच. अलीकडेच 'पक्किम'ला (Pakyong) नवा विमानतळ झालाय तो मात्र थेट गँगटोकजवळ.

सिलिगुडीहून सिक्कीममध्ये प्रवेश केला की आधी आपलं ओळखपत्र तपासतात आणि मगच प्रवेश. आता खरी चढण सुरु होते. तीस्ता नदीच्या काठा-काठाने जसा रस्ता चढत जातो तसा हवेत गारवा जाणवू लागतो. बाजूची झाडांची रुंद पानं हळूहळू निमुळती होऊ लागतात आणि नकळत आपण सिक्कीमच्या राजधानीत, गॅंगटोकला, येऊन पोहोचतो.


सिक्कीमला जायचे मार्ग


रस्ता: सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक
रेल्वेमार्ग: न्यू जलपैगुडी - सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक
हवाईमार्ग: बागडोगरा - सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक किंवा  पक्किमहुन थेट गॅंगटोक