Monday, March 4, 2019

सिक्कीम: पूर्वतयारी

भारतात खूप कमी ठिकाणं आहेत जिथे आपण (भारतात राहून) साक्षात हिमालय ओलांडू शकतो. सिक्कीम त्यातलं एक! तीन बाजूंनी उत्तुंग पर्वतांच्या सापटीत अडकलेलं हे 'अंगठ्याच्या' आकाराचं चिमुकलं राज्य थेट गंगा-ब्रह्मपुत्रेच्या मैदानात, बंगालमध्ये 'चिकन्स नेक'पाशी उतरतं.

सिक्कीमच्या आजूबाजूला नेपाळ, चीन आणि भूटान हे तीन देश, तर 'चिकन्स नेक'पाशी जवळीक करणारा बांगलादेश चौथा. या शेजाऱ्यांच्या अस्तित्वामुळे साहजिकच इथे सैन्याचा जागता पहारा!

हे एकमेव राज्य आहे जे स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर तीन दशकं स्वतंत्र देश होतं आणि स्वेच्छेने भारतात सामील झालं. एकमेव राज्य जिथे आपण वाहनात बसून 'नथुला' खिंडीत चीनची सीमा बघू शकतो. एकमेव राज्य जे भारताच्या सर्वोच्च शिखराला, कांचनजंगाला, टेकलेलं आहे!

इथले मूळचे लोक 'लेपचा'. ते म्हणे खूप आधी पूर्व आशियातून इथे आले. इथले राज्यकर्ते होते 'भुटिया'. ते म्हणे तिबेटमधून इथे आले. पण संख्येने सर्वाधिक आहेत ते 'नेपाळी'. अर्थातच, नेपाळमधून आलेले. त्यामुळे इथल्या 'वेगळ्या' दिसणाऱ्या, पण हसऱ्या लोकांची भाषा मात्र आपल्याला समजणारी!

आता सिक्कीमला जायची तयारी करूयात. आपण भारतीय नागरिक, त्यामुळे आपलं सरकारी ओळखपत्र तयार ठेवायला हवं. शिवाय सिक्किममधल्या सीमावर्ती भागात जायला जे परवाने लागतात त्यासाठी आपले फोटोसुद्धा जवळ ठेवुयात, ऐनवेळी अडचण यायला नको. जर कुणी परदेशी नागरिक असेल तर मात्र त्यांना 'इनर लाईन परमिट' घ्यावं लागतं. (तरीही, जाण्यापूर्वी एकदा "नियम बदलले तर नाहीत ना" याची खातरजमा करून घ्यावी!)

सिलिगुडी म्हणजे सिक्कीमचं प्रवेशद्वार. जरीआपण विमानाने बागडोगराला आलो किंवा रेल्वेने न्यू जलपैगुडीला,  खरा प्रवास सुरु होणार तो सिलिगुडीहूनच. अलीकडेच 'पक्किम'ला (Pakyong) नवा विमानतळ झालाय तो मात्र थेट गँगटोकजवळ.

सिलिगुडीहून सिक्कीममध्ये प्रवेश केला की आधी आपलं ओळखपत्र तपासतात आणि मगच प्रवेश. आता खरी चढण सुरु होते. तीस्ता नदीच्या काठा-काठाने जसा रस्ता चढत जातो तसा हवेत गारवा जाणवू लागतो. बाजूची झाडांची रुंद पानं हळूहळू निमुळती होऊ लागतात आणि नकळत आपण सिक्कीमच्या राजधानीत, गॅंगटोकला, येऊन पोहोचतो.


सिक्कीमला जायचे मार्ग


रस्ता: सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक
रेल्वेमार्ग: न्यू जलपैगुडी - सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक
हवाईमार्ग: बागडोगरा - सिलिगुडी - कालीमपॉंग - गॅंगटोक किंवा  पक्किमहुन थेट गॅंगटोक


No comments:

Post a Comment