या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूंनी लगट करणारा चिनी ड्रॅगन तर तिसऱ्या, नेपाळच्या, बाजूला कांचनजंगावर वास्तव्य करणारी झोन्गा देवता अश्या आंतर्राष्ट्रीय शेजारामुळे उत्तर सिक्कीमला येण्यासाठी परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजन्टने आधीच सगळी तयारी केलेली असते. त्यामुळे मंगन, रंगरंग अशा रस्त्यात येणाऱ्या चेकपोस्ट्सना आपली कागदपत्रं दिली जातात आणि आपण पुढे जातो.
आता मात्र रस्ता कठीण होऊ लागतो. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं अस्तित्वच नसतं. जेंव्हा आपला ड्रायव्हर धबधब्यातून येणारं पाणी जिथे दरीत उडी घेतं त्या (वाहून गेलेल्या) रस्त्यातून आपली गाडी घालतो तिथे मात्र काळजाचा ठोका चुकतो! एकीकडे उंच डोंगर, दरीमध्ये वाहणारी तीस्ता नदी. क्वचितप्रसंगी आपल्याला खोल दरीतून येणारी खळखळही ऐकू येते तर कधी दोन डोंगरांच्या फटीतून कांचनजंगा दर्शन देतं!
कडेकपारीतून दिवसभर प्रवास करून आपण चुंगथांगला येऊन पोचतो. इथे दोन रस्ते फुटतात: एक लाचुंगला जातो तर दुसरा लाचेनला. आपण डावीकडचा रस्ता धरतो आणि चढत-चढत लाचेन (अर्थात, मोठी खिंड) या छोट्याश्या वस्तीवर येऊन पोचतो.
लाचेनच्या भन्नाट वाऱ्याला आणि कडाक्याच्या थंडीला तोंड देत कसंबसं सामान टाकायचं आणि जेवायची तयारी करायची. जेवण तरी कुठलं? वरण -भात आणि बटाट्याची भाजी. पण कुठलीही तक्रार न करता लवकरात लवकर झोपायला हवं कारण उद्या आपल्याला पहाटे उठून जगावेगळ्या गुरुदोंगमार लेकला जायचं आहे!
कांचनजंगा व्ह्यू पॉईंट
लाचेनला जाताना बघायची ठिकाणे
सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल्सकांचनजंगा व्ह्यू पॉईंट
No comments:
Post a Comment