सिक्कीमच्या पूर्वेकडे हिमालयायची उंचच उंच रांग आहे. त्याच रांगेत एका ठिकाणी आहे 'नथुला'. तिबेटी भाषेत 'ला' म्हणजे खिंड. अर्थात, ही 'नथु' खिंड! प्राचीन काळी भारत-चीन व्यापार याच खिंडीतून चाले. जगप्रसिद्ध 'सिल्क रूट'चा एक फाटा इथूनच जायचा. अलीकडे सिक्कीम (भारत) तर पलीकडे खोलगट चुंबी व्हॅली (तिबेट, चीन). त्याच्याही पलीकडे उंचावर दिसणारा भूटान! सामरिकदृष्ट्या अत्यंत नाजूक प्रदेश.
'नथुला'ला जायला परमिट लागतं. आपला ट्रॅव्हल एजन्ट किंवा हॉटेलवालाही त्यासाठी मदत करू शकतो. आधीच तयार ठेवलेल्या फोटोचा इथे उपयोग होतो.
हा प्रदेश अतिउंचीवरचा. त्यामुळे थंडीबरोबरच विरळ हवेचा त्रास. त्यामुळे इथे येण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा.
नाथूलासाठी सकाळी लवकर निघायचं, कारण पुन्हा एकदा वाहनांच्या रांगा! गँगटोकजवळचं चेकपोस्ट ओलांडलं की रस्ता एकदम चढायला लागतो. तीव्र उतार आणि धोकादायक वळणं पार करून आपण 'छांगू लेक'पाशी (Changu Lake किंवा Tsomgo Lake) पोचतो. आजूबाजूचे हिमाच्छादित पहाड आणि समोरचं निळंशार सरोवर! समोरच्या हिमनदीहून येणारं बर्फगार वारं झेलत आपण याकच्या पाठीवर बसायची संधी थोडीच सोडणार?
मनसोक्त 'याक राईड' झाल्यावर आपली गाडी वळते चीनच्या दिशेने, अर्थात नथुलाकडे. चढ वाढत जातो आणि आजूबाजूला बर्फच बर्फ दिसू लागतं. लवकरच दूरवर सैनिकांच्या हालचाली दिसू लागतात आणि आपण नथुलाला पोचतो!
बर्फाळलेल्या पायऱ्या चढत आपण सीमेपाशी पोचतो. एकीकडे भारत तर फूटभर पलीकडे चीन, आणि त्यामध्ये साधं तारेचं कुंपण! बाजूलाच एक सामाईक चौक, जिथे दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्या 'फ्लॅग मिटींग्स' होतात. (आणि आठवणीने एक खुर्ची बाबा हरभजनसिंगसाठी रिकामी ठेवली जाते!) इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत, भन्नाट वाऱ्यात आपले सैनिक कसे रहात असतील ते बाबा हरभजनसिंगच जाणो!
नथुलाच्या पायऱ्या उतरून गाडीत बसलो की आपला मोर्चा वळतो बाबा हरभजनसिंगाच्या समाधीकडे. बाबाचं मूळ मंदिर आहे त्याच्या बंकरमध्ये. पण ते ठिकाण दुर्गम असल्याने लष्कराने जवळच त्याचं मंदिर बांधलंय. "बाबा नवसाला पावतो" अशी सगळ्यांची धारणा आहे, वाटलं तर आपणही अनुभव घेऊन बघू!
नाथूलाचं हवामान बेभरंवशाचं. कधी हिमवादळ येईल किंवा दरड कोसळेल याचा भरवसा नाही. याच्या पुढचा उत्तर सिक्कीमचा प्रवास तर अधिक खडतर, त्यामुळे घरी सुखरूप परत जाईपर्यंत 'बाबा'चा धावा करायला पर्याय नाही!
नथुला
बाबा हरभजनसिग मंदिर
बाबा हरभजनसिंग बंकर (हे खूप दूर आहे)
नाथुलाला बघायची ठिकाणे
छांगु लेक (याक राईड)नथुला
बाबा हरभजनसिग मंदिर
बाबा हरभजनसिंग बंकर (हे खूप दूर आहे)
No comments:
Post a Comment