Tuesday, March 5, 2019

सिक्कीम: लाचुंग-युमथांग

तुम्ही The Sound of Music हा सिनेमा बघितला आहे का? त्याच्यातलं साल्झबर्ग गाव आठवतंय? एक उंच पर्वतकडा, त्याच्या माथ्यावर बर्फाची टोपी, पायथ्याशी चिमुकलं गाव, सभोवती हिमशिखरं—अगदी तस्साच आहे लाचुंग परिसर! अगदी चित्रातल्यासारखा!

लाचेनहून निघून चुंगथांग गाठायचं आणि उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे जाऊन लाचुंग. पोचल्यावर परत एकदा वरण-भात, बटाट्याची भाजी असं फक्कड (!) जेवायचं आणि रात्री लवकर झोपी जायचं. तशी काल रात्री फारशी झोप झालेलीच नाहीय. दुसऱ्या दिवशी सिक्किममधला सर्वात सुंदर भाग बघायला जायचंय!

सकाळी आन्हिकं उरकायची आणि निघायचं. पहाडात चढताना थोड्याच वेळात रस्त्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेल्या पाट्या दिसतात. "अरे, हे इथे कुठे?" असा विचार मनात येइपर्यंत Maratha Light Infantryची पाटी दिसते आणि समोरच आपले मराठमोळे जवान! त्यांना भेटल्यावर त्यांना आणि आपल्याला, दोघांनाही, माहेरचं माणूस भेटल्यासारखं वाटतं!

आता खडी चढण सुरु होते. एकीकडे एक उत्तुंग हिमकडा आपली साथ देत असतो आणि अचानक चहूकडे ऱ्होडोडेंड्रॉन्सचं 'जंगल' लागतं. चार-पाच फूट उंचीची झुडपं, त्यावर लागलेली लाल भडक फुलं आणि आसमंतात पसरलेला मादक गंध! इतका भडक लाल रंग कदाचित आपण प्रथमच पाहात असतो!

या Shingba Rhododendron Sanctuaryमध्ये कितीही मोह झाला तरी फुलांना हात लावायचा नाही, कुणी बघितलं तर मोठा दंड भरावा लागेल! पण इतक्या सुंदर नजाऱ्याचे फोटो मात्र जरूर काढायला हवेत—भडक फुलांचं जंगल, चहुबाजूनी हिमशिखरे, पाठीमागे हिमकडा. क्या बात है!

थोडं अजून पुढे गेलं की याकचे आणि झिपऱ्या घोड्यांचे कळप दिसू लागतात. कधीतरी त्यांच्याबरोबर भलंमोठं तिबेटन मॅस्टिफ जातीचं कुत्रं लक्ष वेधून घेतं.

आता आपण एका 'विचित्र' ठिकाणी पोचतो. एका बाजूला ढासळलेला कडा, दुसरीकडे आडवे झालेले सूचिपर्णी वृक्ष, मध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेला रस्ता—एखाद्या भयपटात शोभावी अशी जागा! 2011 सालच्या भूकंपाचं एपिसेन्टर इथेच होतं म्हणे!

या भीषण आणि विद्रुप ठिकाणाहून पुढे गेल्यावर मात्र आपण एका स्वप्ननगरीत येऊन पोचतो. हीच ती युमथांग व्हॅली—सिक्किममधलं सर्वात सुंदर ठिकाण! एका बाजूला उत्तुंग हिमशिखरं, दुसरीकडे घनदाट जंगल असलेला डोंगर आणि त्यांच्या दरम्यान बशीसारखी पसरट युमथांग व्हॅली.

व्हॅलीच्या एका बाजूने रस्ता जातो तर दुसऱ्या बाजूने एक उथळ नदी. आणि या दोहोंच्या दरम्यान पसरलेलं प्रचंड मोठं कुरण. इथली गंमत म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हे कुरण छोट्या रानफुलांनी भरून जातं! पुढच्या आठवड्यात ही फुलं सुकतात आणि दुसऱ्या प्रकारची फुलं फुलतात. जूनपर्यंत हा खेळ सुरु असतो! ही सिक्कीमची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स डोळ्यांचं पारणं फेडते. खरं तर इथे निवांत वेळ काढायला हवा. अफाट कुरण आणि त्यावर चरणारे याक, फोटो तो बनता है! पण हा आनंद अर्ध्यावरच ठेवून आता पुढे निघायला हवं, कारण आता आपल्याला बर्फात खेळायला जायचंय!

युमसामदोन्ग (Yumesamdong) हे यापुढचं शेवटचं ठिकाण. यापुढे रस्ता नाही, म्हणून याला झीरो पॉईंट म्हणतात. युमथांग व्हॅली सोडून पुढे निघालं की हळूहळू झाडं-झुडपं विरळ होत जातात. वाट उंच चढत जाते आणि सगळीकडे रखरखाट पसरतो. उभे पहाड, खोल काळ्याकुट्ट दऱ्या आणि खडी चढण चढता चढता अचानक स्नो लाईन लागते आणि चमत्कार होतो. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फच-बर्फ! डोळे दिपून जातत. बर्फातून वाट काढत आपण एका सपाटीवर येतो आणि रस्ता संपतो—हाच तो झीरो पॉईंट!

चहूकडे बर्फ, त्यातून गेलेला रस्ता, शेजारी अनेक ठेले आणि त्यावर भुट्टा, चणे, मॅगी, मोमो आणि दारू (!) विकणारे भुटिया लोक. पलीकडच्या बर्फ़ातूनच एक छोटासा झरा वाहतो, त्यावर एक पूल आणि त्यापलीकडे बर्फाची टेकडी. खेळा लेको किती बर्फ खेळायचं ते!

बर्फात खेळून कंटाळलं की परतायचं, त्याच रुद्रभीषण मार्गावरून खाली उतरायचं, युमथांग व्हॅलीमध्ये कुरणावर मस्त लोळायचं आणि संध्याकाळच्या आत परत लाचुंगला.

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry) बघण्यासारखी आहे. तिथे भेट द्यायची आणि रात्री परत हॉटेलवर. उत्तर सिक्कीमची स्वप्नातली दुनिया सोडून उद्या आपल्याला परत गँगटोकला जायचंय.

लाचुंग परिसरात बघायची ठिकाणे 

लाचुंगचा बौद्धमठ (Lachung Monestry)
Shingba Rhododendron Sanctuary
युमथांग व्हॅली
युमथांग हॉट स्प्रिंग्स
युमसामदोन्ग, अर्थात झीरो पॉईंट



No comments:

Post a Comment