Monday, March 4, 2019

सिक्कीम: गुरुदोंगमार लेक

भारतात खूप कमी ठिकाणं आहेत जिथे आपण (भारतात राहून) साक्षात हिमालय ओलांडू शकतो, गुरुदोंगमार लेक त्यापैकी एक! सिक्कीमच्या उत्तरेला हिमालय ओलांडून जायला एक फट आहे, तिथून आपण थेट तिबेटच्या पठारावर जाऊ शकतो. तिथेच आहेत भारतातली अति-उंचीवरची दोन सरोवरं: त्सो लामो लेक (Tso Lhamo Lake) आणि गुरुदोंगमार लेक (Gurudongmar Lake).

गुरुदोंगमार लेक समुद्रसपाटीपासून 5183 मीटर, म्हणजेच 17000 फुटांवर आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी, विरळ हवा आणि लहरी हवामान. दुपारी बारानंतर इथे रोज वादळ होतं, त्यामुळे अर्थातच लवकरात लवकर इथे जाऊन सुखरूप परत यायचं!

हे सरोवर तिबेटच्या (चीनच्या) सीमेपासून चार-पाच किलोमीटरवर आहे. त्यामुळे अर्थातच गुरुदोंगमार लेकला जायला स्वतंत्र परमिट लागतं. पण आपल्या ट्रॅव्हल एजंटने सगळी तयारी आधीच केल्यामुळे आपलं काम सकाळी लवकरात लवकर निघायचं.

दुपारच्या वादळाच्या आत परतायचं असल्यामुळे लवकरच निघावं लागतं. शिवाय वेगात चढत गेल्यावर विरळ हवेचा त्रास (altitude sickness) जास्त होतो, त्यामुळे शक्य तेवढं सावकाश चढायचं. पहाटे चारच्या आत चढाई सुरु व्हायला हवी.

पहाटे लवकर निघाल्यामुळे कदाचित नाश्ता झालेला नसतो, पण आपल्याजवळ तहानलाडू-भूकलाडू असलेले केव्हाही उत्तम. भरपूर पाणी प्यायल्यावर (आणि लघुशंका केल्यावर) आल्टीट्यूड सिकनेसचा त्रास कमी होतो. त्यामुळे भरपूर पाणी जवळ ठेवावं (आणि कडाक्याच्या थंडीत इच्छा नसली तरी) पीत राहावं! अर्थात अशा दुर्गम ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची शहानिशा डॉक्टरकडून आधीच करून घेतलेली बरी.

भल्या पहाटे लाचेन सोडल्यावर आपली जीप रस्त्यासारख्या दिसणाऱ्या (!) वाटेने चढू लागते. हाडं खिळखिळी करत आणि काळजाचा ठोका चुकवत खडी चढण सुरु होते. बाजूचं घनदाट जंगल हळूहळू बदलू लागतं. सूचिपर्णी वृक्षांच्या जागी खुरटी ऱ्होडोडेंड्रॉन्स दिसू लागतात आणि पहाता-पहाता निसर्ग बदलतो.

आता सगळीकडे रखरखाट दिसू लागतो. आजूबाजूला उघडे डोंगर आणि त्यावर तुरळक बर्फ, म्हणजे आता आपण स्नो-लाईन ओलांडली असते! त्याच्याही पल्याड उंचच-उंच हिमाच्छादित पर्वतशिखरं हळूच डोकावू लागतात आणि आपण 'थांगू' नावाच्या खेड्यात पोचतो.

थंडी 'मी' म्हणत असते, भन्नाट वारं वहात असतं. कसाबसा जीव सांभाळत आपण एका खोपट्यात शिरतो आणि त्या 'हॉटेल'ची मालकीण, एक भुटिया म्हातारी, आपलं स्वागत करते!

मोमो, मॅगी, गरम चहा, हवी असल्यास दारू (व्हिस्की, ब्रँडी, इत्यादी) असा भरगच्च मेनू आपल्यासाठी तयारच असतो. खायचं प्यायचं आणि सुटायचं! (एक महत्वाची सूचना: कितीही मोह झाला तरी हाय-आल्टीट्यूडला मद्यपान टाळावेच. विरळ हवेचा त्रास जास्त होतो.)

हॉटेलमध्ये नाश्ता (!) करून निघाल्यावर आपली गाडी आता वेग घेते. चढण आता कमी झालेली असते आणि बऱ्यापैकी सपाटीवरून आपली गाडी धावत असते. मनुष्यवस्तीचं शेवटचं ठिकाण म्हणजे 'थांगू'. आता यापुढे रस्त्यात फक्त तुरळक याकचे कळप, त्याबरोबर एखादं 'तिबेटन मॅस्टिफ' जातीचं भलंमोठं कुत्रं आणि दऱ्याखोऱ्यात दडलेले सैनिकांचे सुसज्ज बंकर्स! हां, एक सांगायचं राहिलंच. लवकरच एक चांगलं हॉटेल येणार आहे!!!

बरोब्बर पंधरा हजार फूट उंचीवर लष्कराचं ठाणं आहे. काही लष्कराच्या गाड्या, बराकी आणि त्यातच एक कामचलाऊ हॉस्पिटलसुद्धा आहे! तिथे लष्कराचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. कुठलाही त्रास होत असेल तर प्रथमोपचार करून, गरज असेल तर, पेशंटला कमी उंचीवर पाठवलं जातं. आणि या हॉस्पिटलसमोरच आहे Cafe 15000, जगातलं सर्वाधिक उंचीवरचं हॉटेल!

कॅफे 15000मध्येही जवळपास तेच पदार्थ मिळतात: मॅगी, मोमो, सामोसे आणि कांदाभजीसुद्धा! इथे रॉकेलच्या हीटरशेजारी बसून बसून गरमगारम भजी खायची मजा वेगळीच! खरंतर हेसुद्धा एक छोटंसं खोपटंच. दोन बाकडी, एक हीटर, एक काउंटर आणि छोट्याश्या देव्हाऱ्यात बाबा हरभजनसिंगचा फोटो!

इथले सैनिक मात्र खूप प्रेमळ! हसतमुख आणि मदतीला तयार. एखादा सातारा-कोल्हापूरकडचा असेल तर आपल्या भज्यांचे पैसेही तोच भरणार! आपल्याबरोबर लहान मूल असेल तर त्यांच्यातलं कुणीतरी चॉकलेट देणार. अशा खडतर ठिकाणी सैनिकांच्या नुसत्या दर्शनानेही आपल्याला आधार वाटतो!

भरपेट नाश्ता केल्यावर आपली गाडी सुसाट निघते. एव्हाना आपण भारतीय उपखंड ओलांडून, हिमालयाच्याही पलीकडे, तिबेटच्या पठारावर आलेलो असतो. यापुढे जवळपास सपाट आणि डांबरी सडक. त्यामुळे बघता-बघता आपण एका टेकडीपाशी येतो. समोरचा रस्ता "त्सो लामो लेक"ला जातो. भारतातलं ते सर्वोच्च सरोवर, पण तिथे जायचा परवाना मिळणं अवघड. पण इथे तर आपण भारतातल्या दुसऱ्या उंच सरोवरापाशी पोचलोय. गाडी एक छोटीशी चढण चढते आणि आपोआपच "अहा!" असे उद्गार बाहेर पडतात! समोर साक्षात गुरुदोंगमार लेक दिसतं.

समोर हिमाच्छादित पर्वत, त्यातून येणारी हिमनदी या निळ्या-पांढऱ्या सरोवरात अलगद उतरते. बहुतेक सरोवर गोठलेलं, पण एका भागात मात्र स्वच्छ पाणी. गुरु रिम्पोचे, अर्थात गुरु पद्मसंभवांनी स्पर्श केल्यामुळे सरोवराचा हा भाग हिवाळ्यातही गोठत नाही म्हणतात.

गाडीतून उतरताना मात्र जपून! विरळ हवेची कल्पना खाली उतरल्यावरच येते. एकेक पाऊल टाकणंही मुश्किल, सरोवरापाशी खाली उतरायचा विचार न केलेलाच बरा! सावकाश चालत, दम खात शेजारच्या 'सर्व धर्म स्थल' या मंदिराला भेट द्यायची आणि तडक परतीचा रस्ता धरायचा. माध्यान्हीच्या आधी इथून खाली उतरायला हवं!

परतीच्या मार्गावर 'चोपता व्हॅली'चे फोटो काढायचे आणि लाचेनला पोचायचं. आपल्याला आजच लाचुंगला पोचायचं आहे. (टीप: 'चोपता व्हॅली' नावाचं अजून एक ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे!)

गुरुदोंगमार लेकला जाताना बघायची ठिकाणे

थांगू व्हॅली
15000 कॅफे
गुरुदोंगमार लेक
चोपता व्हॅली


No comments:

Post a Comment