Monday, December 16, 2013

अस्थंबा

महाराष्ट्राच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेल्या सात डोंगररांगा अहेत. एकमेकांना समांतर जाणारी ही सात पुडं (ranges) म्हणजेच सातपुडा पर्वत. याच पर्वताच्या सुदूर पश्चिमेला नंदुरबार जिल्हा आहे. अरबी समुद्रावरून येणारं बाष्पयुक्त वारं इथल्या पर्वतरांगांवर आदळतं आणि मुसळधार पाऊस पाडतं. त्यामुळे इथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये घनदाट जंगल आहे. भिल्ल, पावरा, तडवी, पाडवी हे आदिवासी इथले रहिवासी.

याच भागात आहे अस्थंब्याचा डोंगर. हा डोंगर चढायला तसा अवघडच. आजूबाजूला खोल दऱ्या, त्यामध्ये निबिड अरण्य आणि चढायला निमुळती पायवाट. असल्या धोकादायक वाटेकडे एरवी सहसा कुणी फिरकत नाही. पण दरवर्षी दिवाळीत मात्र इथे जत्रा भरते. दूरदूरचे आदिवासी बांधव इथे आवर्जून हजेरी लावतात.

भल्या पहाटे, खरं तर मध्यरात्री, हातात मशाल घेऊन डोंगर चढाई सुरु होते. गुडुप अंधारात, खोल खाईच्या कडेने, तोल सांभाळत डोंगर चढायचा म्हणजे येरा गबाळ्याचं काम नाही. पण इथे तर सगळे निर्धास्तपणे चालत असतात. सगळ्यांना खात्री असते की ते डोंगरावर सुरक्षित पोचणार आहेत. कुठलीतरी अदृश्य शक्ती त्यांची काळजी घेणार आहे. आणि समजा कुणी वाट चुकलाच तर…?

अंधारातून एक जख्ख म्हातारा काठी टेकत येतो. त्याचं शरीर कंप पावत असतं, चेहरा सुरकुतलेला असतो आणि डोक्याला फडकं गुंडाळलेलं असतं. चुकलेल्याला तो धीर देतो, रस्त्यापाशी आणून सोडतो आणि नकळत आला तसाच दिसेनासा होतो. नंतर कितीही शोधलं तरी तो सापडत नाही! वर्षानुवर्षं हे असंच चाललंय. इतकी वर्षं, खरं तर इतक्या पिढ्या झाल्या तरी तो म्हातारा आहे तसाच आहे. जख्ख, सुरकुतलेला आणि कंप पावणारा…

त्या म्हाताऱ्याचं नाव आहे अस्थंबा, म्हणजे अश्वत्थामा… महाभारतातला!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा आणि दुर्योधनाचा मित्र. त्याच्या कपाळावर एक मणी होता. युद्ध संपल्यावर, सूडाच्या भरात त्याने मध्यरात्री पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला आणि द्रौपदीच्या मुलांना झोपेतच ठार केलं. याची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला आणि त्याला अमरत्वाचा शाप दिला!

तेव्हापासून अश्वत्थामा भटकतोय… कपाळावरची भळभळती जखम घेऊन, असह्य वेदना सोसत, आणि एकटेपणाचं जिणं जगत… त्याच्या वेदनांना अंत नाही, कारण त्याला मृत्युचं वरदान नाही! सगळे त्याला झिडकारतात आणि तो रानोमाळ भटकत रहातो…एकटाच!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महाभारतातला अश्वत्थामा खरंच होऊन गेला का? बहुधा असावा. तो खरंच चिरंजीव आहे का? नसावा. निदान आजवरच्या शास्त्रीय माहितीनुसार तरी… पण जर अश्वत्थाम्याकडे एक व्यक्ती म्हणून न पहाता एक तत्त्व म्हणून पहिलं तर…?

आपल्या आजूबाजूला नीट बघितलं तर अनेक अश्वत्थामे दिसतील. शरीराने जर्जर, मनाने खचलेले. त्यांना जिणं असह्य झालंय पण मृत्यू काही येत नाही! मग मात्र जाणवेल की अश्वत्थामा नक्कीच चिरंजीव आहे! असो…

महाभारतातल्या अश्वत्थाम्याने सातपुड्यात आल्यावर मात्र स्वतःचा उःशाप स्वतःच शोधला! एकटेपणाच्या शापावर मात करत तो आदिवासींमध्ये मिसळला आणि त्यांचा अस्थंबा ऋषी झाला! आता तो स्वतःच्या जर्जर शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि इतरांना मदत करतो. त्याच्या अनुभवांचा इतरांना उपयोग होतो. स्वतःच्या दुःखाची तमा न बाळगता तो चुकलेल्या वाटसरूला रस्ता दाखवतो. त्याच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाट चुकलेल्या किती तरी लोकांना मार्ग सापडला आहे. आणि म्हणूनच लोक इतक्या दुर्गम ठिकाणी असलेल्या अस्थंब्याचा दर्शनाला जीव धोक्यात घालून येतात!

No comments:

Post a Comment