Tuesday, November 5, 2019

जम्मू-कश्मीर आणि लद्दाख: हिमालयाच्या अल्याड-पल्याड

जम्मू-कश्मीर आणि लद्दाख: हिमालयाच्या अल्याड-पल्याड

दिनांक 31 ऑक्टोबर 2019 या दिवशी भारत सरकारने जम्मू आणि कश्मीर या राज्याचं व्दिभाजन झाल्याचं जाहीर केलं आणि "जम्मू आणि कश्मीर" आणि "लद्दाख" हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. दोन दिवसांत गृह मंत्रालयाने नकाशे प्रसिद्ध केले आणि हे केंद्रशासित प्रदेश "नक्की कसे असतील" हे स्पष्ट झालं. नीट बघितलं तर लक्षात येतं की जम्मू-कश्मीर आणि लद्दाख म्हणजे हिमालयाच्या अल्याड-पल्याड!

द्विभाजनापूर्वीचं जम्मू आणि कश्मीर राज्य (आपण त्याला "जम्मू-कश्मीर राज्य" किंवा नुसतंच "राज्य" म्हणूयात) म्हणजे डोगरा, कश्मीरी, गिलगिती, वाखी, बल्ती, लद्दाखी, पहाडी, गुज्जर अशा अठरापगड लोकसमुहांची खिचडी! त्यातले बहुतांश मुस्लिम, पण तरीही मोठ्या प्रमाणात हिंदू, आणि थोडेसे बौद्ध. बहुधा ते भारतातलं सर्वात वैविध्यपूर्ण राज्य होतं. याचं कारण समजून घ्यायचं असेल तर तिथला भूगोल समजून घ्यायला हवा.

जम्मू-काश्मीर राज्य हे भारतीय उपखंडाचं उत्तर टोक आणि मध्य आशियाचं प्रवेशद्वार. हिमालय, काराकोरम, कुनलुन, पामिर आणि हिंदुकुश या जगातल्या सर्वोच्च पर्वतांनी इथे दाटी केलीय. काही पर्वतरांगा तर इतक्या उत्तुंग की त्या पार करणं केवळ अशक्य. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या दोन्ही बाजूंना अगदी विभिन्न प्रकारच्या संस्कृती बहरत गेल्या. हिमालयाची मुख्य रांग (Greater Himalayas) या राज्याला आरपार चिरून जायची. सहाजिकच त्याच्या अल्याड-पल्याडचे लोक, त्यांच्या भाषा, वंश, धर्म, संस्कृती अगदीच वेगळं होतं.

जम्मू-काश्मीर राज्याच्या सामरिक महत्त्वामुळे (strategic importance) या प्रदेशावर आजूबाजूच्या देशांचा डोळा होता. सहाजिकच इथली माणसं, इथला भूगोल, इतिहास आणि (आंतरराष्ट्रीय) राजकारण याचं समग्र चित्र (Big Picture) बघायला हवं!

इतिहास

1947 साली धर्माच्या भारताची आधारावर फाळणी झाली आणि मोठा पेचप्रसंग उभा राहिला. इथला महाराजा हिंदू डोगरा, पण त्याला स्वतंत्र रहायचं होतं (असा प्रवाद आहे). कश्मीरमधील बहुसंख्य प्रजा मुस्लिम, पण त्यांना पाकिस्तान नको होता. तिकडे गिलगितच्या लोकांना "डोगरा" राजा नको होता. या सगळ्या गोंधळात पाकिस्तानने पठाण टोळीवाल्यांना हाताशी धरलं आणि हल्ला केला. मग महाराजांनी धावतपळत भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. शेवटी भारत-पाकिस्तान युध्द झालं आणि एका क्षणी ते थांबवलं गेलं. पाकिस्तानने जिंकलेला भाग म्हणजे  POK (Pakistan-occupied Kashmir) आणि युद्ध थांबलं ती रेषा म्हणजे LOC (Line of Control). गेली सात दशकं जवळपास परिस्थिती 'जैसे थे' आहे.

1963 साली तर गंमतच झाली. पाकिस्तानने काराकोरम पर्वताच्या उत्तरेची "शक्सगाम व्हॅली" (Trans Karakoram Tract) परस्पर चीनला देऊन टाकली. यालाच म्हणतात "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!" त्यांनतर मात्र पाकिस्तान आणि चीनचं "अतूट" मैत्रीपर्व सुरू झालं.

1970 साली पाकिस्तानने POK चे दोन तुकडे केले. उत्तर दिशेला, हिमालयाच्या पल्याडचा दूर दराज़ का इलाका म्हणजे "गिलगित-बल्तिस्तान" (GB) आणि अल्याडचा, पंजाबला चिकटून असलेल्या भाग म्हणजे "आझाद जम्मू आणि कश्मीर" (AJK). भारताला अर्थातच हे नाव मान्य नाही!

जम्मू-काश्मीर राज्याच्या पश्चिम आघाडीवर हे सगळं सुरू असतानाच पूर्व आघाडीवर, "अक्साई चिन" भागात वेगळंच नाट्य घडत होतं.

त्याचं असं झालं की स्वातंत्र्यानंतर जरी जम्मू-काश्मीर राज्य तांत्रिकदृष्ट्या भारताचं झालं तरी अक्साई चिनसारख्या परिसरात आपण पोहचलोच नव्हतो. हा प्रदेश अतिदुर्गम, वैराण आणि निर्मनुष्य. कालांतराने आपण तिथे गेल्यावर कळलं की चीनने तिथे एक रस्ताच बांधून टाकलाय!

मग काय, चर्चा, चकमकी आणि शेवटी 1962 सालचं भारत-चीन युद्ध. तेंव्हापासून "अक्साई चिन" भागात "चीन" ठाण मांडून बसलाय. किरकोळ वादविवाद सोडले तर इथली Line of Actual Control (LAC) तशी शांतच असते. पण 2017 साली "दोकलाम प्रश्न" उद्भवला तेंव्हा मात्र LAC "पेटली होती". म्हणजे काय, तर भारत आणि चीन या "अण्वस्त्रधारी महासत्तांच्या" सैनिकांनी लाठ्या-काठ्यांनी हाणामारी केली आणि एकमेकांवर दगडफेक केली! पूर्वी आईन्स्टाईन म्हणाला होता "World War IV will be fought with sticks and stones" बहुधा त्याचीच "प्रॅक्टिस" करत असावेत!!!

अजून एक राहिलंच! भारताच्या ताब्यात असलेल्या भागाच्या उत्तर टोकाला "काराकोरम पास" नावाची खिंड आहे. प्राचीन काळच्या "सिल्क रूट"चा एक फाटा तिथून यारकंद आणि काशगरला जायचा. या खिंडीच्या पश्चिमेला "सियाचिन ग्लेशियर" आहे. हा भाग तसा भयंकरच! इतका दुर्गम की तिथे सर्व्हे करून नकाशे करणंही शक्य नव्हतं.

1972 साली "सिमला अग्रीमेंट" झालं आणि भारत-पाकिस्तानने LOC वर आहे तिथेच थांबायचं आणि चर्चेने प्रश्न सोडवायचा असं ठरलं. पण LOC ठरवताना "सियाचिन ग्लेशियर" तशीच सोडून दिली—कारण नकाशेच नव्हते!

1984 साली भारताला कुणकूण लागली आणि भारताने या "अशक्यप्राय" पर्वतरांगांवर सैन्यच पाठवलं. तेंव्हापासून सियाचिन ग्लेशियर आणि शेजारच्या पर्वतरांगा भारताच्या ताब्यात तर खालचा भाग पाकिस्तानकडे. ना ते वर येऊ शकत, ना आपण खालचा भाग जिंकू शकत. जगातल्या सर्वोच्च युध्दभूमीवरही परिस्थिती "जैसे थे"!

असो! इतिहास पुष्कळ झाला, आता लोकांकडे वळू. त्यापूर्वी AJK (आझाद जम्मू आणि कश्मीर), GB (गिलगित-बल्तिस्तान), Trans Karakoram Tract (किंवा शक्सगाम व्हॅली), Siachen Glacier (सियाचिन हिमनदी), Aksai Chin (अक्साई चिन) ही अवघड नावं मात्र लक्षात ठेवू.

"अल्याडचा" भूगोल

जम्मू-काश्मीर राज्याच्या भूगोल बघितल्याशिवाय इथली माणसं समजणारच नाहीत. आपण दक्षिणेकडून सुरुवात करू... 

पंजाबचं मैदान संपतं आणि हिमालयाच्या "शिवालिक टेकड्या" (Sivalik Hills) सुरु होतात. इथून उत्तर दिशेला "पीर पंजाल" (Lesser Himalayas) रांगांपर्यंत पसरलेला डोंगराळ प्रदेश म्हणजे "जम्मू". इथले बहुतेक लोक हिंदू डोगरा. त्यांची भाषा आणि संस्कृती बरीचशी पंजाबसारखीच. आजूबाजूच्या डोंगरात गुज्जर-बाकरवाल वगैरे लोक राहतात. तिकडे पहाडी, गोजरी अशा भाषा बोलल्या जातात. जम्मू शहर, (पाकव्याप्त कश्मीरमधलं) मिरपूर शहर, वैष्णोदेवी मंदिर हे सगळं याच भागातलं.

पीर पंजाल पहाड चढून गेलं की "कश्मीर" येतं. झेलम नदीचं हे खोरं उत्तरेला "हिमालय" पर्वतापर्यंत (Greater Himalayas) पसरलंय. इथले कश्मीरी लोक बहुतांशी मुस्लिम. अर्थात भट्ट, कौल, रैना, खेमू, सप्रू, बांगरू, नेहरू, कोटरू, गुर्टू, मट्टू, टपलू असे (गंमतीदार आडनावांचे) कश्मीरी पंडितही इथलेच! हिंदू असो किंवा मुस्लिम, इथल्या लोकांची भाषा "कश्मीरी (किंवा कोशूर)".

कश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेला "किशनगंगा" नदीकिनारी "शारदा पीठ" होतं. आता ते उध्वस्त झालंय. शिवाय पाकिस्तानव्याप्त भागात असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष कोण देणार? असो. या किशनगंगेच्याच जवळपास "मुझफ्फराबाद" हे शहर आहे. पाकिस्तान त्याला "आझाद कश्मीरची" राजधानी म्हणतं. "त्यांच्याकडे" 370 वं कलम नसल्याने इथे पंजाबी आणि पख्तुन (पठाण) लोकांची संख्या वाढत गेली. या परिसरात आता पंजाबी, पश्तू, हिंदको, पहाडी आणि (थोड्या प्रमाणात!) कश्मीरी भाषा बोलली जाते.

"किशनगंगा" हे नाव न आवडल्याने (!) पाकिस्तानने तिचं "नीलम नदी" असं बारसं केलाय. याच नदीच्या काठाने हिमालयाच्या पल्याड जायचा रस्ता आहे, पण त्याबद्दल नंतर बोलू. आधी अल्याडचं पूर्ण करू.

भारताच्या नवीन नकाशानुसार पंजाबच्या मैदानापासून हिमालय पर्वतापर्यंतचा सर्व प्रदेश म्हणजे "जम्मू आणि कश्मीर केंद्रशासित प्रदेश" (यात AJK सुद्धा येतोच). जरी इथे डोगरा, कश्मीरी असे वेगवेगळे लोक राहात असले तरीही सगळे "आर्य वंशाचे". त्यांच्या भाषाही Indo-Aryan कुळातल्या.

(इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, आणि भारतीय उपखंडातले बरेच लोक हे स्वतःला "आर्य वंशाचे" म्हणवतात. त्यांचं दिसणं, त्यांच्या भाषा, मौखिक परंपरा, लोककथा, आख्यायिका यात काहीतरी "कनेक्शन" आहे. Caucasoid वगैरे अवघड शब्द वापरण्याऐवजी, मलातरी "आर्य" शब्द सोपा वाटतो, म्हणून वापरला! हे आर्य म्हणजे नक्की कोण, ते इथले का बाहेरचे यावर बरेच वाद आहेत. आपण त्यावर आजतरी बोलूया नको!)

"पल्याडचा" भूगोल

काश्मिरचं सौंदर्य सगळ्यांना माहित असतं. पण हिमालयाच्या पल्याड त्याहीपेक्षा काहीतरी भन्नाट आहे हे फारच कमी जणांना माहित असतं. जेम्स हिल्टनच्या Lost Horizon मधली "शांग्री-ला" तिकडेच आहे म्हणे!

हिमालय ओलांडला की थंड वाळवंट सुरू होतं. उत्तुंग पर्वत, माथ्यावर थोडं हिम आणि खोल खोल दऱ्यांमध्ये जाणारे रखरखीत पण अफलातून उतार. लेह-लद्दाख भागात ज्यांनी प्रवास केला आहे त्यांना हे माहित असेलच. या भागातले लोक दिसायला तिबेटी लोकांसारखे. धर्म बौद्ध आणि भाषा लद्दाखी.

जरा पश्चिमेला, कारगिल भागात आलं की मुस्लिम वस्ती सुरू होते. हे लोकही लद्दाखीच पण त्याच्यात जरा आर्य वंशाची सरमिसळ झाली आहे. हे लोक "बल्ती-पुरगी" भाषा बोलतात. (जवळच्या द्रास भागात "शिना" भाषा बोलतात, पण त्याबद्दल थोडं नंतर.)

कारगिलच्या जवळच LOC आहे ("टायगर हिल" आठवत असेलच!). ती ओलांडली की पाकिस्तानव्याप्त "बल्तिस्तान" येतं. इथले "बल्ती" लोक आणि कारगिलचे "पुरिग" लोक जवळपास सारखेच. एकेकाळचे हे बौद्ध लोक आता शिया आणि नूरबक्षी मुस्लिम पंथांचे आहेत. खरं पाह्यलं तर "स्कर्दू" शहरातली बल्ती, "कारगिल"ची पुरगी आणि "लेह"ची लद्दाखी—तिन्ही भाषा एकाच प्रकारच्या. आणि हो, (धर्म वेगळे असले तरी) लोकही एकाच प्रकारचे!

बल्तिस्तान म्हणजे "जगातला" सर्वाधिक पर्वतमय प्रदेश! इथला Concordia भाग तर अफाट-अचाट असाच म्हणावा लागेल. इथे अगदी हाकेच्या अंतरावर जगातली सर्वोच्च शिखरं आहेत. शिवाय Deosai Plateau सारखं सौंदर्य जगात क्वचितच सापडेल!

बल्तिस्तानच्या उत्तरेला काराकोरम पर्वत आणि दक्षिणेला हिमालय. त्यादरम्यानच्या खोऱ्यातून सिंधू नदी वाहते. ही वायव्यवाहिनी नदी अचानक हिमालयाला वळसा घालून दक्षिणवाहिनी होते. जवळच गिलगित नदीचा संगम होतो, त्यामुळे जणूकाही इंग्लिश Y आकाराचे तीन प्रवाह एकत्र येताना दिसतात. याच Y च्या बेचक्यात जगातले तीन पर्वतही एकत्र येतात—पूर्वेला हिमालय, उत्तरेला काराकोरम आणि पश्चिमेला हिंदुकुश!

इथून उत्तरेचा भाग म्हणजे पाकिस्तानव्याप्त "गिलगित" प्रदेश. हा भाग म्हणजे मध्य आशियाचं प्रवेशद्वार! प्राचीन काळचा "सिल्क रूट" इथल्या काराकोरमच्या दुर्गम रांगांमधूनच जात असे. दक्षिणेला कश्मीर आणि पख्तुन प्रदेश, पूर्वेला बल्तिस्तान, उत्तरेला मध्य आशिया, पश्चिमेला अफगाणिस्तानचा "वाखान" प्रदेश. वस्तूंच्या व्यापाराबरोबर माणसांचीही ये-जा वाढली. त्यामुळेच इथल्या (मुख्यतः आर्य वंशाच्या) लोकांवर तिबेटी आणि मध्य आशियाची छाप दिसते!

गिलगित शहराजवळ बोलली जाणारी "शिना" भाषा ऋग्वेदकालीन संस्कृतच्या बरीच जवळची आहे म्हणे! प्राचीन काळी (कदाचित) इंद्र-वरुणाची उपासना करणारे इथले लोक मध्यकालात बौद्ध होते. आता मात्र इथले लोक शिया, नूरबक्षी, आगाखान संप्रदायाच्या मुस्लिम धर्माचे आहेत.

पूर्वीच्या "सिल्क रूट"चं नवं रूप म्हणजे चीनने बांधलेला "काराकोरम हायवे"! गिलगितहून चीनकडे जाताना रस्त्यात "हुंझा व्हॅली" येते. अप्रतिम सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातच कुठेतरी "शांग्री-ला" आहे म्हणतात! इथले "बुरुशो" लोक शतायुषी असतात अशी वदंता आहे, तर कुणी म्हणतात की ते अलेक्झांडरबरोबर आलेल्या ग्रीकांचे वंशज आहेत!

हुंझाच्या वरच्या भागात "वाखी" लोक राहतात. "पामिर" पर्वताच्या कुशीत राहणाऱ्या या लोकांची भाषा शेजारच्या अफगाणिस्तानातल्या दारी भाषेसारखी.

भारताच्या नवीन नकाशानुसार हिमालयाच्या पल्याडच्या, अगदी काराकोरमच्या उत्तरेच्या "शक्सगाम व्हॅली"पर्यंतचा, सर्व प्रदेश म्हणजे "लद्दाख केंद्रशासित प्रदेश" (यात पाकिस्तानव्याप्त गिलगित-बल्तिस्तानसुद्धा येतो).

हिमालयाच्या पल्याडचा सगळाच प्रदेश भन्नाट आहेत. इथले रांगडे पहाड, हिमनद्या, सिंधू नदी, देवसाई पठार आणि हुंझा-नगरसारखी खोरी, सगळं सगळं जगावेगळं आहे.  काही जणांच्या मते कश्मीरपेक्षा अनेक पटीने सुंदर!

पण हिमालयाच्या अल्याड-पल्याड दोन्ही बाजू बघितलेले लोक असतील तरी किती? आपल्याला (भारतीयांना) "तिकडे" जायची संधी कधी मिळणार? कुणास ठाऊक!

पण अशक्य काहीच नसतं. कुछ भी हो सकता है!!!

लेखक: संतोष देशपांडे (dsantosh1972@gmail.com)

संपादन:

3 नोव्हेंबर 2019: लेखन/प्रकाशन