Thursday, July 20, 2017

नथुलाचा बाबा

सिक्कीम हे भारताच्या ईशान्येचं छोटंसं राज्य. सिलिगुडीच्या 'चिकन्स नेक'वर धरलेला छोटासा अंगठाच जणू. किंवा भारताने चीनला दाखवलेला ठेंगा! त्याला कारणही तसंच आहे. 1976 पर्यंत सिक्कीम एक देश होता, पण त्यावेळच्या सार्वमताचा कौल भारताच्या बाजूने पडला आणि सिक्कीम भारतात आला. त्यावेळी चीनने खूप आदळआपट केली, पण... असो, त्याविषयी पुन्हा कधीतरी. 

तर या अंगठ्याच्या तीन बाजूंना तीन देश - पश्चिमेला नेपाळ, उत्तर आणि पूर्वेला चीन अन अग्नेयेला भूतान. साऱ्याच सीमा उत्तुंग पर्वतरांगांनी वेढलेल्या. त्यातल्या पूर्व सीमेवर आहे नथुला किंवा 'नथु' खिंड!  एकेकाळच्या प्रसिद्ध 'सिल्क रूट'चा एक फाटा इथून जायचा. 

भारत आणि चीनच्या दरम्यान चांगली चार-एक हजार किलोमीटरची सीमा आहे. पण जर तुम्हाला पर्यटक म्हणून चीनची सीमा बघायची असेल तर मात्र एकच ठिकाण. ते म्हणजे नथुला! कारण तसंच आहे. सगळा प्रदेश इतका दुर्गम आहे की बऱ्याच ठिकाणी सैनिकसुद्धा वर्षभर राहू शकत नाहीत. नथुलालासुद्धा बेभरंवशाचं हवामान, विरळ हवेचा त्रास, अफाट थंडी, वगैरेला तोंड द्यावंच लागतं. पण आपण निदान जीपमध्ये बसून जाऊ शकतो. अडवाटेच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांची परिस्थिती मात्र फारच बिकट असते... तोच तर आजचा विषय आहे!

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````

गोष्ट आहे 1968 सालची, एका सैनिकाची. त्याचं नाव हरभजन सिंग. अगदी 22 वर्षांचा तरुण. सीमेवर गस्त घालायला गेला आणि दरीत पडला. परत आला नाही म्हणून शोधाशोध केली पण कुठे दिसला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र तो दिसला, एका मित्राच्या स्वप्नात! म्हणाला या दरीत माझं प्रेत आहे. शोधा, अंत्यसंस्कार करा आणि माझं मंदिर बांधा! आणि खरंच त्याचं प्रेत तिथे होतं...!

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````

'बाबा' हरभजन सिंगाचं मंदिर म्हणजे तिथल्या सैनिकांचा जीव की प्राण. रोज इमाने इतबारे त्याची पूजा होते, दर्शन घेतलं जातं, नवस बोलले जातात. एवढंच नाही तर त्याच्या बुटांना पॉलिश केलं जातं, त्याचा पगार त्याच्या कुटुंबियांना पोचवला जातो, वर्षात एकदा त्याच्या नावे रजा घेतली जाते, न्यू जलपैगुडीहून त्याच्या गावी जाणाऱ्या रेल्वेत त्याचा बर्थ रिकामा ठेवला जातो...!

तर हा 'नथुलाचा बाबा' त्याच्या सैनिक भक्तांना स्वप्नात दृष्टांत देतो आणि संकटांची पूर्वसूचना देतो. वादळ असो किंवा हिमप्रपात, तीन दिवस आधी तो सैनिकांना स्वप्नात सांगतो. सीमेपलीकडेही तीच गत... चुंबी व्हॅलीमधल्या चिनी सैनिकांनाही तसंच स्वप्न पडतं म्हणे! शिवाय कधीकधी मध्यरात्री पर्वतशिखरांवर एक घोड्यावर बसलेला सरदारजी त्यांना दिसतो! त्यामुळे 'फ्लॅग मीटिंग'च्या वेळी चिनी अधिकारी हमखास एक खुर्ची रिकामी ठेवतात!!!

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````

तर ही बाबा हरभजनसिंगाची कहाणी, कल्पिताहूनही अद्भुत. खरं-खोटं ते (भारतीय आणि चिनी)
सैनिकच जाणे. पण त्या दुर्गम पहाडांमध्ये, भीषण वादळांमध्ये, अंधाऱ्या रात्री एकट्या सैनिकांना ते 'अस्तित्व' (किंवा त्या अस्तित्वाची नुसती कल्पना) आधार देऊन जाते हे मात्र खरं!